Crime News

शहादा :- तालुक्यातील वडाळी येथील ज्वेलर्सच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. कुलूप तोडत असतांना दुकानाच्या शेजारी राहणाऱ्या डॉक्टरांना वेळीच जाग आल्याने चोरट्यांचा हा चोरीचा डाव फसला. या घटनेमुळे गावातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

वडाळी येथील मुख्य बाजारपेठेत प्रकाश सोनार यांचे श्री आशापुरी ज्वेलर्स या नावाने सोन्या-चांदीचे दागिने विक्रीचे दुकान असून शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे व्यवहार आटोपून दुकान बंद करुन दुकानाच्या वरच्या मजल्यावरच असलेल्या घरी निघून गेले. दरम्यान, मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास बोरेलो गाडीतून आलेल्या पाच ते सहा चोरट्यांनी या दुकानाचे एका बाजूचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला.

अन चोरट्यांचा डाव फसला
चोरटे शटरच्या मध्यभागी असलेले सेंट्रल लॉक तोडण्याचा प्रयत्न करीत असतांना आवाज झाल्याने शेजारी राहणारे डॉ. कैलास जगताप यांना जाग आल्याने त्यांनी प्रसंगसावधानता प्रकाश सोनार यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला व घडत असलेल्या प्रकाराबाबत माहिती. प्रकाश सोनार यांनी तातडीने बाहेर येत आरडाओरडा केली. यामुळे चोरट्यांचा डाव फसला व चोरट्यांनी बोलेरो गाडी घेऊन शहादाच्या दिशेने पोबारा केला.

चोरटे पसार होण्यात यशस्वी
घटनेची माहिती पोलीस पाटील गजेंद्रगीर गोसावी यांना कळविल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती सारंगखेडा पोलीस स्टेशनला कळविली. त्यानंतर पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पो.कॉ. गणेश गावित, शहाणाभाऊ ठाकरे, दला शेख, सुरतसिंग राजपूत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनेची माहिती कळताच सारंगखेडा पोलिसांकडून कार्यक्षेत्रासह चेकपोस्टवर नाकाबंदी करण्यात आली, मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान, सराफा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोरटे कैद झाले असून पोलिसांकडून त्याआधारे शोध घेण्याचे कार्य सुरु केले आहे.

दुसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न
वडाळी येथील बाजारपेठेत दोन वर्षात तिसऱ्यांदा तर श्री आशापुरी ज्वेलर्समध्ये दुसऱ्यांदा चोरीचा प्रत्यन करण्यात आल्याचा प्राकार घडला आहे. यापूर्वी देखील दिवसा ढवळ्या याच सराफ दुकानात ताईत घेण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी थेट दुकानात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने व पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र प्रकाश सोनार यांच्या मुलाच्या सतर्कतेमुळे हा डाव देखील फसला होता. यावेळी चोरट्यांनी सोनार बाप-लेकांना मोटरसायकलवरून २०० मीटरपर्यंत फरकटत नेले होते. त्यावेळी देखील चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले होते.

ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद
व्यापारी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत प्रशासनाने हजारों रुपये खर्च करून शहादा – शिरपूर रस्ता, बसस्थानक, ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स, जी. एस. विद्यामंदिर, बाजार चौक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, बसस्थानक, सराफ दुकान परिसर व जी. एस. विद्यामंदिर गेट शेजारील हे तीन सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. हे कॅमेरे सुरू असते तर चोरट्यांचा माग काढण्यात मदत झाली असती. ग्रामपंचायत प्रशासनाने बंदावस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यन्वित करावेत तसेच पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *