जळगाव : गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने (हुतात्मा दिनी, दि. ३० जानेवारी) स्वस्थ समाज व सामाजिक समरसता निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज प्रबोधनासाठी व गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी आयोजित “ग्राम संवाद सायकल यात्रे”ची आजपासून सुरुवात होत आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते सायकल यात्रेस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात होणार असून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त अशोकभाऊ जैन यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

ग्राम संवाद सायकल यात्रा १२ दिवस चालणार असून जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील जळगाव, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, यावल, भुसावळ तालुक्यातून सुमारे ३५० किमीचा प्रवास करणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी, शिक्षक, महिला व नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. या सायकल यात्रेत विविध राज्यातून येणारे व स्थानिक अशा ४० स्वयंसेवकांचा सहभाग निश्चित झाला आहे.

व्याख्याने व महिलांसाठी विशेष कार्यक्रम

यात्रेदरम्यान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जामनेर, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड, सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर या महाविद्यालयात व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वाकोद, फत्तेपूर, बोदवड व भुसावळ येथे महिलांसाठी विविध स्पर्धा, खेळ व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात्रेत दररोज दोन कार्यक्रम शाळा / महाविद्यालयात तर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने तयार करण्यात आलेली प्रदर्शनी कार्यक्रमांच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे. तसेच निरोगी व सशक्त समाजाच्या निर्मितीच्या उद्देशाने या यात्रेत प्रबोधन करण्यात येणार आहे. प्रश्नमंजुषा, व्याख्यान, खेळ, नाट्य व पपेट शोचा वापर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांची सांगता स्वच्छता संबंधित प्रतिज्ञेने होणार आहे. विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग देऊन सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *