नंदुरबार :- पगारवाढ व सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते काढून बिल मंजूर करण्यासाठी ७ हजाराची लाच मागणाऱ्या नंदुरबार पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकास लाच लुचपत प्रतिबंधक (Anti Corruption Bereau) विभागाकडून रंगेहात अटक करण्यात आली आहे. तर मोघम २ हजाराची लाच मागणाऱ्या दुसऱ्या कनिष्ठ सहाय्यकाविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे पंचायत समिती अंतर्गत शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांची सातारा येथून नंदुरबार येथे आंतरजिल्हा बदली झाली आहे. तक्रारदार यांनी त्यांचे जुलै 2021 ते मे 2023 या कालावधीतील पगारवाढ व सातव्या वेतन आयोगाचे उर्वरीत हप्ते काढून बिल मंजूर करून देण्याची विनंती त्यांनी ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक दादाभाई फुला पानपाटील (वय ५४) यांच्याकडे केली होती. दरम्यान, ही बिले मंजूर करून देण्याच्या बदल्यात पानपाटील (वय ५४) यांनी ७ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तर सुखदेव भुरसिंग वाघ (वय ४३) यांनी देखील १ ते २ हजार रुपयांची मोघम मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

यांनी केली कारवाई
तक्रार दाखल झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचायत समितीच्या आवारातच सापळा रचला. यावेळी पानपाटील यांना पंचायत समितीच्या आवारातील वाहन पार्किंग जवळील लोखंडी गेट जवळ ७ हजाराची लाच स्वीकारतांना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. तर मोघम लाचेची मागणी करणाऱ्या सुखदेव वाघ यांच्यावर गुन्हा करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, हवालदार विजय ठाकरे, देवराम गावित, संदीप नावाडेकर, अमोल मराठे व मनोज अहिरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

One thought on “नंदुरबार पंचायत समितीच्या कनिष्ठ सहाय्यकास लाच घेतांना अटक; एकाविरुद्ध गुन्हा दाखल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *