पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे गेल्या दोन दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. ड्रीम ११ या ऑनलाइन गेममधून त्यांनी दीड कोटी रुपये जिंकले आहेत. मात्र या दीड कोटींमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर करावाई करण्यात येईल, मग झेंडे यांची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी सतीश माने यांनी दिली असून त्याचा तपास पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे झेंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

झेंडे यांनी बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यासाठी ड्रीम इलेव्हनवर टीम लावली होती. सामना संपल्यानंतर सोमनाथ झेंडे यांनी त्यांचा मोबाईल चेक केला तेव्हा त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. दीड कोटी जिंकल्यानंतर सब इन्सपेक्टर करोडपती झाले आहेत, त्यामुळे त्यांचं कुटुंबही खूश झालं आहे. तरीही ऑनलाईन गेमिंग धोकादायक असल्याचं झेंडे यांनी सांगितलं. अशा गेम्सपासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे, कारण याचं व्यसन लागून आर्थिक नुकसानही होऊ शकतं, असं आवाहन झेंडे यांनी केलं आहे.

झेंडे यांनी दीड कोटी रुपये जिंकल्यानंतर भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र व्यवहार केला आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हालचाली सुरू करण्यात आल्या असून संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कोण आहेत सोमनाथ झेंडे?

सोमनाथ झेंडे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावचे राहणारे आहेत. गेल्या १५ ते १६ वर्षांपासून ते प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांना ऑनलाइन गेममध्ये दीड कोटी रुपये मिळाल्याने कुटुंबीय आनंदात आहे. मात्र चौकशीचा ससेमिरा मागे लागणार असल्याने झेंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *