रोहित पवारांपुढे सत्ताधारी गप्पगार

ह्या पोराला निट निरखून बघा काल पर्यंत हा पोरगा कुठल्या तरी टपरीवर चहा पिताना, कधी वडापाव खाताना तर कधी मिसळपाव खातानाचे फोटो व्हिडीओज् व्हायरल व्हायचे आणि आपण शहाणे सुरते लो त्याच्या ह्या कृत्याचा त्याच्याच भाषेत “आस्वाद” घ्यायचो.

आठवतोय ना शब्द??? आज मी ह्याचा आस्वाद घेतला, वगैरे पोस्टींचा रतीब पाडून आपण ह्याच्या कृतींवर हस्यास्पद टिका करायचो तो हाच पोरगाय बरंका.

परवा ह्या पोरानं पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर स्वतःच्या मतदार संघात MIDC सुरु व्हावी चांगल्या गुंतवणूका याव्या म्हणून आंदोलन केलंय, आणि राज्याच्या उद्योगमंत्र्याने मात्र उद्याच तुझं काम मार्गी लावतो म्हणत त्या पोराशी मिटींग लावून त्याची कशीबशी बोळवण केली. काल त्या पोरानं ठरलेल्या वेळात मिटींगला उपस्थिती लावली पण उपटून ठेवलेल्या ढिगाचे भारे बांधायचे बाकी होते म्हणून की काय उद्योगमंत्र्याने मात्र चार तास ह्या पोराला वाट बघायला लावली आणि मिटींग रद्द झाली. पण आज ह्या पोरानं कहर केला, मी शरद पवारांचा नातू, अजितदादांचा पुतण्या वगैरे घरणेशाही बासनात गुंडाळून राज्यभरातल्या तरुणाईसाठी सभागृह डोक्यावर घेतलं पण कुठला माय का लाल ह्या पोराचे मुद्दे खोडून काढायला सभागृहात उभा राहिला नाही, ह्याने सुरुवात केली ती स्वतःच्या मतदार संघात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची योजना यावी म्हणून,तेव्हा समजलं ह्या पोरानं चहा, वडापाव किंवा‌ मिसळीचा आस्वाद फक्त म्हणायलाच घेतलाय, हा तर तिथल्या जनसामान्यांमध्ये मिसळून त्यांच्या गरजा समजून घ्यायचा प्रयत्न करत होता, MIDC च्या मुद्द्याला धरुनच ह्याने दूसरा मुद्दा
उपस्थित केला तो म्हणजे IFSC सेंटर गुजरातला गेल्याचा आणि सत्ताधारी मात्र कुणीतरी सन्नकन कानशिलात लगावल्यासारखे शांत बसून ऐकत होते.
स्वतःचा काका ज्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री आहे त्या सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर उभा राहून हा पोरगा राज्यभरातल्या तरुणांसाठी भाषण करत होता.
त्याने तिसऱ्या मुद्द्याला हात घातला आणि महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या गुंतवणूकीव्यतिरिक्त किती गुंतवणूक सध्याचं सरकार आणतंय ह्याची आकडेमोड दिली.

त्याला लागूनच चौथा मुद्दा उपस्थित केला तो
स्पर्धापरिक्षांच्या फिसचा युपीएससी १०० रुपये, एमपीएससी ३०० रुपये फिस आकारत असताना इतर इतर भरत्यांसाठी १००० रुपये कशासाठी? त्यातच त्याने तलाठी परिक्षेच्या परिक्षार्थींचा आकडा आणि रिक्त पदांमधली तफावत सांगून सभागृहाला प्रत्येक परिक्षार्थीच्या फिसचा मनोमन हिशोब करायला भाग पाडलं. मेगा भरतीच्या घोटाळ्यावर बोट ठेवून जर सरकारी भरत्या करण्यासाठी प्रायव्हेट कंपन्या लागत असतील तर सरकार काय करतंय हा प्रश्न अप्रत्यक्षरित्या आख्ख्या सभागृहालाच विचारला, मुंबईतल्या हिरे व्यापाऱ्यांना गुजरात मधून येणाऱ्या धमक्यांवरही बोट ठेवलं आणि माझ्या मतदार संघातला कुणीही‌ त्याचं कुटूंब सोडून पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी करायला जायला लागू नये म्हणून मी एम आय डी सी मागतोय असं ठणकावून सांगितलं.

होय हा तोच पोरगाय ज्याला कालपर्यंत आपण शरद पवारांचा नातू, अजितदादांचा पुतण्या म्हणून गृहित धरत होतो, त्याच रोहित पवाराने काल आख्खं सभागृह क्षणात शांत केलं, स्वाभिमानी महाराष्ट्राचा उद्योगधंद्यात पहिला नंबर येत होता पण गुजरातच्या निवडणूकांनी महाराष्ट्राचा कसा घात केला हे सांगणारा रोहित पवार एकमेवाद्वितीय युवा आमदार सध्याच्या सभागृहात बसलाय हे विषेश

रोहित पवारानं आज्ज्याकडून बाकी काही नाही घेतलं पण जनमाणसात मिसळून इथल्या समाजघटकांच्या मुलभूत गरजा समजून घेण्याईतपत शरदचंद्र पवार साहेब मात्र नक्कीच आचरणात आणलेत….!

रोहित पवारांपुढे सत्ताधारी गप्पगार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *