यावल तालुक्यातील वढोदा – शिरसाड रोडवरील घटना; महिला अधिकाऱ्याला जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

जळगाव :- अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्या महिला मंडळ अधिकाऱ्याचा हात धरून ट्रॅक्टरवरून खाली ओढत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील वढोदा – शिरसाड रोडवर घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अवैधरित्या वाळू वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने वाळू चोरट्यांची हिम्मत वाढून अधिकाऱ्यांवर हात उगारण्याइतपत त्यांची मुजोरी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या नाशिक येथील विभागीय पथक, जळगाव जिल्हा महसूल पथक व पोलीस प्रशासनाने गिरणा नदी पात्र व बांभोरी गावात संयुक्त कारवाई करत शंभरावर वाहने जप्त केली होती. त्यानंतर तरी अवैधरित्या वाळू वाहतूक व वाहतूकदारांच्या मुजोरीला चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र यावल तालुक्यातील वढोदा – शिरसाड रोडवर घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा अधिकाऱ्यांवर वाळू माफिया शिरजोर असल्याचे दिसून आले आहे.

महिला अधिकाऱ्याचा हात धरून ओढले खाली
बामणोद (ता. यावल) येथे कार्यरत असलेल्या मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांनी गुरुवारी वढोदा – शिरसाड रोडवर अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. यावेळी ट्रॅक्टर पळवून नेऊ नयेत म्हणून त्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हर सीटवर बसलेल्या असताना एका तरुणाने त्यांचा हात धरून त्यांना खाली ओढत जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून महिला अधिकाऱ्याला जखमी करणाऱ्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली माहिती
घटनेची माहिती कळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी
दूरध्वनीद्वारे संपर्क साधत माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी तातडीने बैठक बोलवत अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोहीम राबविण्याचे निर्देश दिल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *