Crime News

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी : नितीन सावळे
नंदुरबार :- अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत वारंवार पैशांची मागणी केल्याच्या त्रासाला कंटाळून रनाळे (ता.नंदुरबार) येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे. सेक्सटॉर्शनच्या प्रकारातून ही घटना घडल्याचे परिसरात बोलले जात असून याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, रनाळे येथील २४ वर्षीय युवकाला काही अज्ञात व्यक्तींनी 8013437507 व 7342431228 या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून आपण दिल्ली येथे पोलीस असल्याचे सांगून तुझे अश्लिल व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारीत करू, अशी धमकी दिली होती. व्हिडीओ प्रसारीत न करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याने या युवकाने 38 हजार 999 रुपये त्या व्यक्तींना फोन पेच्या माध्यमातून पाठविले होते. परंतु, त्यानंतरही वारंवार पैशांची मागणी केली जात असल्याने या त्रासाला कंटाळून या युवकाने शुक्रवार (4 ऑगस्ट) रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी मयताच्या मोठ्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *