शिरुड चौफुलीजवळील भीषण घटना; गंभीर जखमी तरुणावतर रुग्णालयात उपचार सुरु

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी : नितीन सावळे

शहादा :- पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक देत दुचाकीवरील युवकाला लांबोळा गावापर्यंत फरफटत नेल्याची भीषण घटना बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास शहादा प्रकाशा रस्त्यावर घडली. या घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे.

मुसेब जाकिर तेली (वय – २३) व समर नजीम तेली, (वय – २०), (दोघेही रा. गरीब नवाज कॉलनी, शहादा) हे दोन्ही मित्र बुधवार दि.१६ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास दुचाकीने शहादा-प्रकाशा रस्त्याकडून घराकडे जात असताना पाठीमागून येणारा ट्रक (क्रमांक MH -18, BA – 0702) ने मोटर सायकलला जोरदार धडस दिली. धडस दिल्यानंतर ट्रक चालकाने गाडी न थांबविता मुसेब तेली याला दुचाकीसह थेट लांबोळा गावापर्यंत फरफटत नेले. यात मुसेब याचा जागीच मृत्यू झाला तर समर तेली गंभीर जखमी झाला असून त्याला शहादा येथील डॉ. बी. डी. पटेल यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अक्कलकुवा येथून ट्रक ताब्यात
अपघातानंतर ट्रक चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. शहादा पोलिसांनीही तातडीने नाकाबंदी करत तसेच ट्रकचा पाठलाग करत अक्कलकुवा येथून ट्रक ताब्यात घेतला. ट्रक चालक मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध भादवी कलम 304 (अ), 279, 337, 338, 427, मोटर वाहन कायदा कलम 184, 134, 187 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण पावरा करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *