गोव्यातील आगशी येथील घटनेने सगळेच हैराण ; वाचा नेमके काय आहे प्रकरण

पणजी : एखादी व्यक्ती मेली, त्या व्यक्तीवर तुमच्यासमोर अंत्यसंस्कारही झाले मात्र, तीच व्यक्ती अचानक तुमच्या समोर येऊन उभे राहिली तर… पँट ओली झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र, अशीच एक हैराण करणारी घटना गोव्यातील आगशी येथे घडली आहे. मृत्यूच्या दोन महिन्यानंतर तीच व्यक्ती कुटुंबियांसमोर  येवून उभी राहिल्याने कुटुंबीयांसमवेत पोलीस देखील चांगलेच अवाक झाले आहेत. दरम्यान, या प्रकाराची राज्यभरात चर्चा सुरू झाली असून याबाबत आगशी पोलिसांकडून तपास कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पणजी पोलिसांना ७ ऑक्टोबर २०२३ रोजी एक मृतदेह सापडला होता. याप्रकरणी पोलिसात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी तपासाअंती ही मृत व्यक्ती आगशी येथील मिलाग्रेस गोन्साल्विस असल्याचा निष्कर्ष काढून याबाबतची त्यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर मिलाग्रेसच्या कुटुंबीय व नातेवाइकांनी देखील मृतदेहाची ओळख पटविली. मृतदेहाची ओळख पटल्याने पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. त्यानंतर कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यासंस्कार करून दोन महिने उलटल्यानंतर आता अचानक मिलाग्रेस घरी परतल्याने सर्वांना धक्का बसला आहे.

चर्चेला उधाण…

मृत्यूच्या दोन महिन्यानंतर अचानक ती व्यक्ती कुटुंबीयांसमोर येऊन उभी राहिल्याने ही घटना राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान या घटनेतनंतर पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केली असून लवकरच यामागील सत्य माहिती समोर येणार आहे. 

आजारपणामुळे सोडले घर

मिलाग्रेस गोन्साल्विस (वय ५९) यांनी आजारपणाला कंटाळून घर सोडल्याची बोलले जात आहे. मिलाग्रेस अचानक गायब झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली होती. यादरम्यान, पोलिसांना पणजीत एक मृतदेह मिळाला होता. तो मृतदेह मिलाग्रेस यांच्या कुटुंबीयांना दाखविण्यात आला. त्या मृतदेहाचे साधर्म्य मिलाग्रेस यांच्याशी असल्याने तो मृतदेह मिलाग्रेस यांचा असल्याचे समजून मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबीयांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, पोलिसांकडून देखील मिलाग्रेस गोन्साल्विस (वय ५९) नामक व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र, तीच व्यक्ती आता जिवंत घरी परतल्याने कुटुंबीयांना सुखद धक्का बसला आहे.

तपासाला सुरूवात 

मिलाग्रेस गोन्साल्विस घरी परतल्यानंतर पोलिसांकडून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला पोस्टमार्टम रिपोर्टवर नाव बदलण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले तो मृतदेह नेमका कोणाचा? हा प्रश्न पोलिसांसमोर उभा झाला आहे. त्यामुळे पोलीस पुन्हा कामाला लागले असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *